छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वडिलांकडून शेती घेण्यासाठी १० लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुला घरात राहू देणार नाही, असे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या ९ जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित विवाहितेचे लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती. आरोपी हे सर्व बेळगाव (कर्नाटक) येथील रहिवासी आहेत. २९ डिसेंबर २०२१ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत विवाहितेला सासरी सातत्याने वाईट वागणूक देण्यात आली. "घरात राहायचे असेल तर तुझ्या वडिलांकडून शेती घेण्यासाठी १०
लाख रुपये घेऊन ये," अशी मागणी आरोपींनी लावून धरली होती. जीवे मारण्याची धमकी पैसे आणण्यास नकार दिल्यावर विवाहितेला आणि तिच्या आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. तसेच, वारंवार जीवे मारण्याची धमकी देऊन तिला घरातून हाकलून लावण्याचे प्रयत्न झाले. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी १४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर झाला गुन्हा दाखल विवाहितेच्या तक्रारीवरून पती बसवराज अशोक उप्पार, सासरे अशोक बसवनप्पा उप्पार, दीर अक्षय उप्पार, जाऊ नागम्मा उप्पार, चुलत सासरे मृत्युंजय उप्पार, रेखा उप्पार, राहुल उप्पार, सावित्री सवदती आणि लक्ष्मण सवदती (सर्व रा. श्रीनगर, बेळगाव, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













